
Online Sand Booking in Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे या नवीन लेखात मनापासून स्वागत आहे. आम्ही नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी काहीतरी नवीन, उपयुक्त आणि व्यवहारात उपयोगी पडणारी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण शासकीय वाळू म्हणजेच सरकारी रेती ऑनलाइन पद्धतीने कशी मागवायची, त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे आणि काय काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
प्रत्येक माणसाला स्वतःचे घर असावे असे वाटत असते. घर बांधताना लागणाऱ्या साहित्यांमध्ये वाळू ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण गेल्या काही वर्षांपासून वाळू हा व्यवसाय विविध कारणांमुळे खूपच चर्चेत आणि विवादात राहिला आहे. वाळू चोरी, अवैध वाळू उपसा, वाहतुकीत होणारे गैरव्यवहार, भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि यामुळे निर्माण होणारे गुन्हे या सगळ्या गोष्टींमुळे वाळू व्यवसायाची प्रतिमा समाजात खराब झाली असून, अगदी सरकारी अधिकारी आणि मंत्री यांच्यावरही त्याचे आरोप झालेले आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहिले आहेत.
प्रत्यक्षात पाहिले तर हा व्यवसाय कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा असून बऱ्याच ठिकाणी अवैधपणे देखील चालतो. विविध नियम करून झाले, कारवाई झाली, पण गैरव्यवहार थांबत नव्हते. उलट काही ठिकाणी माफिया जाळे अधिक मजबूत होत गेले आणि सामान्य नागरिकाच्या घर बांधणीवर त्याचा थेट परिणाम झाला. या सगळ्या गोंधळावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन सरकारने (Maharashtra Sand Booking Online) वाळू धोरणात बदल करून 1 मे 2023 पासून नवीन सर्वसमावेशक वाळू धोरण लागू केले.
या नवीन धोरणानुसार, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सरकारी दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसाठी प्रति ब्रास 600 रुपये, म्हणजेच सुमारे 133 रुपये प्रति मेट्रिक टन या दराने (Government Sand Rate in Maharashtra) वाळू मिळते. तसेच घरकुल योजना लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू पूर्णपणे मोफत दिली जाते. यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर वाळू डेपो उभारण्याचे काम सुरू आहे आणि अनेक ठिकाणी त्यांचे उद्घाटनही झाले आहे. श्रीरामपूर येथे काही दिवसांपूर्वी लाभार्थ्यांना मोफत रेती वितरण करण्यात आली होते, हे तुम्ही कदाचित पाहिले असेल.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना महाखनिज पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते. नागरिक स्वतः पोर्टल वरून ऑनलाइन मागणी करू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात. मात्र यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार नंबर असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन पद्धतीने वाळू/रेती बुकिंग (Mahakhanij Portal Registration) कसे करायचे?
स्टेप 1: यासाठी सर्वप्रथम महाखनिजची अधिकृत वेबसाईट mahakhanij.maharashtra.gov.in उघडा. नंतर होम पेज वर Sand Booking हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढील पेजवर तुम्हाला Login हा पर्याय दिसेल. जर तुमचे खाते नसेल तर Consumer Sign Up वर क्लिक करून नवीन खाते तयार करा.
स्टेप 2: यामध्ये तुमचे नाव, ई-मेल आणि मोबाईल नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP समोर विचारलेल्या जागी टाका, यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होते. येथे लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबरच तुमचा लॉगिन आयडी असतो.
स्टेप 3: नोंदणी (Free Sand for Gharkul Yojana Beneficiary) झाल्यानंतर तुमच्या ई-मेलवर तुम्हाला पासवर्ड तयार करण्यासाठी एक लिंक मिळेल. किंवा तुम्ही ओटीपी द्वारे लॉगिन करूनही पासवर्ड सेट करू शकता.
स्टेप 4: एकदा लॉगिन झाल्यावर तुम्हाला तुमचे Profile पूर्ण करणे आवश्यक असते. प्रोफाइलमध्ये तुमचे नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड टाकून तुमचे Aadhar Card, PAN Card, Ration Card आणि तुमचा फोटो अपलोड करा. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा GST नंबर देखील देऊ शकता. सर्व माहिती भरून झाल्यावर Update बटणावर क्लिक करा.
स्टेप 5: प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला Project Registration करावे लागते. म्हणजे तुम्ही कोणत्या बांधकामासाठी वाळू मागवत आहात याची माहिती देणे. यात प्रोजेक्ट टाइप निवडायचा, स्वतःचे घर, घरकुल, सरकारी किंवा खाजगी प्रोजेक्ट आणि बांधकामाचा प्रकार (बिल्डिंग, कंपाऊंड इ.) निवडून किती ब्रास वाळू लागेल हे तिथे टाकायचे आहे. त्यानंतर बांधकामाच्या साईटचा पत्ता टाकून नकाशावरून लोकेशन निवडून Submit करा.
स्टेप 6: पुढे प्रोजेक्ट नोंदणी पूर्ण झाल्यानंतर Book Sand वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट निवडून तुम्हाला आवश्यक असणारी वाळूची मात्रा टाकायची आणि तुमच्या जवळचा डेपो किती अंतरावर आहे ते टाकायचे आहे. जर त्या डेपोत त्या क्षणी वाळू उपलब्ध असेल तर स्टॉक माहिती देखील तुम्हाला बघायला मिळेल.
स्टेप 7: स्टॉक उपलब्ध असल्यास Confirm Booking करा आणि पुढील स्क्रीनवर Online Payment करा. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर Track Order द्वारे तुम्ही वाळू कोठपर्यंत आली आहे ते पाहू शकता, तसेच Transporter या पर्यायातून ट्रान्सपोर्ट (Online Sand Transport Tracking) करणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्कही साधू शकता.